Friday, December 11, 2009

हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि- नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची । चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा मग्न आज जयदुर्ग आंसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनी भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे । भंगले
जाहलीं राजधान्यांची । जंगले
परदास्य-पराभविं सारीं । मंगले
या जगति जगूं ही आज गमतसे लज्जा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुद्धि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे
ती बुद्धि भाबड्या जीवां । लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थें तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

सागरा प्राण तळमळला

ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूता
मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ
सृष्टिची विविधता पाहू
त‍इं जननीहृद्‌ विरहशंकितहि झाले
परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन
त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी
जगद्‌नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी मी
येईन त्वरे, कथुनि सोडिले तिजला
सागरा, प्राण तळमळला

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी
ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु या पुढती
दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे
की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा
हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता, रे
नवकुसुमयुता त्या सुलता, रे
तो बाल गुलाबहि आता, रे
फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला

नभि नक्षत्रे बहुत, एक परि प्यारा
मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य, परी मज भारी
आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिया साचा
वनवास तिच्या जरि वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता, रे
बहु जिवलग गमते चित्ता, रे
तुज सरित्पते जी सरिता, रे
त्वद्‍अविरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला

या फेनमिषें हससि निर्दया कैसा
का वचन भंगिसी ऐसा ?
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते
भिउनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी
मज विवासनाते देशी
तरि आंग्लभूमी भयभीता, रे
अबला न माझि ही माता, रे
कथिल हे अगस्तिस आता, रे
जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला

For Download
http://www.4shared.com/download/111309428/693bc031/SAGARA_PRAN_-_LATA_MINNA.mp3?v=1

जयोस्तुते श्रीमहन्मंगले

जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची
स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी
स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची
स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते
तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण, श्रीस्वतंत्रते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे